RTO News आरटीओ कार्यालयाच्या चकरा थांबणार
RTO News : सर्वसामान्यांच्या आरटीओ कार्यालयातील चकरा आता थांबणार आहे. अनेक सेवा आता तुम्हाला घरचीच पूर्ण करता येणार आहे.
आता तुम्हाला वाहन परवान्यासंबंधीच्या (DL) अनेक कामांसाठी परिवहन कार्यालयाच्या (RTO) चकरा माराव्या लागणार नाहीत. राज्य परिवहन आणि महामार्ग मंत्रालयाने (MoRTH) 58 सेवा आता पूर्णतः ऑनलाईन केल्या आहेत.
या 58 सेवांमध्ये वाहन परवान्याशीसंबंधीत अनेक सेवांचा समावेश आहे. मंत्रालयाने याविषयीची अधिसूचनाही जाहीर केली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना कार्यालयाला नाहक खेटे घालण्याची गरज उरली नाही.
यामध्ये वाहन परवाना, कंडक्टर लायसन्स, परमिट (Permit) आणि मालकी हस्तांतरण (Transfer of Ownership) या सारख्या सेवांचा समावेश आहे.
आधार सत्यापन (Aadhaar authentication) सेवेमार्फत नागरिकांना घरबसल्या या सेवांचा लाभ घेता येणार आहे. त्यासाठी आता आरटीओ कार्यालयात वारंवार जाण्याची आवश्यकता नाही.
मंत्रालयाने शनिवारी या सेवांबाबत माहिती दिली. त्यानुसार, कॉन्टॅक्टलेस आणि फेसलेस या सुविधा देण्यात येणार आहे. यामुळे लोकांचा वेळ वाचेल.
ऑनलाईन सेवांमध्ये शिकाऊ परवान्यासाठी अर्ज, शिकाऊ परवान्यात पत्ता, नाव, फोटो बदलणे, डुप्लीकेट लर्नर लायसन्ससाठी अर्ज करणे आदी सेवांचा समावेश आहे.
आंतरराष्ट्रीय वाहन परवाना काढणे, कंडक्टर लायसन्समध्ये पत्ता बदलणे यासारख्या कामांसाठीही आता आरटीओ कार्यालयाच्या चकरा मारण्याची गरज नाही.
आधार कार्ड नसणाऱ्या व्यक्तीला स्वतः अर्ज सादर करुन या सेवांचा फायदा उचलता येईल.